Tuesday, September 12, 2017

चंदनाचे हात पायही चंदन...

शे. दे. पसारकर 



अप्पासाहेब, आपण जगाचा निरोप घेतला या घटनेला आता एक तप उलटून गेलं. जसजशी वर्षं निघून जातात तसतशी गेलेल्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वावरची मर्त्यपणाची साल हळूहळू गळत जाते अन् मग उरतो तो त्याच्या कार्यकर्तृत्वाचा सोलीव गाभा. माणूस म्हटल्यावर सर्वांना शरीरधर्म अन् रागलोभादी भावना-विकार असणारच. त्यातून कोण सुटला आहे? तुम्हीही आपल्या मुला-नातवंडांवर स्वभावत: उत्कट प्रेम केलं असणार अन् एखाद्या सहकार्‍याची चूक लक्षात आल्यावर तुमचीही भुवई कधी वक्र झाली असणार. ‘माणूस हा असाच आहे, माणूस हा तसाच आहे’ अशी विधानं फार ढोबळ स्वरूपाची असतात. खरं तर माणूस असाही असतो अन् तसाही असू शकतो. घरात तो जसं वागतो तसं त्याला ऑफिसमध्ये वागून चालणार नाही. ऑफिसमध्ये सर्वांवर कुरघोडी करणारा बॉस घरात मुलाचा घोडा होऊन खेळू शकतो, तसं काहीसं. असं असलं तरी काही व्यक्तित्वं सार्वजनिक अधिक असतात. तुमचं  व्यक्तिमत्त्व असंच होतं अन् इतक्या वर्षांनंतर पुन्हा तुमच्याकडे पाहताना तुमची उंची नजरेत अधिकच भरू लागते.

तुमचं समग्र व्यक्तित्वच संस्थारूप झालेलं होतं. सिद्धेश्‍वर देवस्थान, संगमेश्‍वर कॉलेज, साखर कारखाना, संचार, पांजरापोळ असे बहुआयामी पदर तुमच्या व्यक्तित्वाला होते. ज्या संस्थेची धुरा तुम्ही खांद्यावर घेतली ती संस्था भरभराटीला येणार, समृद्ध होणार, दृढमूल होणार हे जणू समीकरणच बनलं होतं. तसंच घडलंही. देवस्थानचे जुने अहवाल जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा त्यातील पानापानावर तुमच्या अर्थकारणाचं दर्शन घडतं. व्यापारउदीम सचोटीनं करता येतो आणि संस्थाही तशाच सचोटीनं चालवता येतात, हे सांगण्याचा काळ आता आला आहे. अप्पासाहेब, आम्ही ज्या जगात राहत आहोत ते घोटाळ्यांचं जग आहे. साडेतीन हजार कोटी म्हणजे नेमके किती रुपये? हे आम्हा सामान्यांना खरंच कळत नाही. घोटाळे करणारे सापडतात पण घोटाळ्यातला पैसा का सापडत नाही, हेही आम्हा सामान्यांच्या बुद्धीला पडलेलं कोडं आहे. अवतीभोवतीच्या अशा पर्यावरणात तुम्ही पैन् पैचा चोख हिशेब दिला आणि प्रत्येक पैसा जपून-तोलून खर्च केला ही घटना नवलकथाच वाटावी.

देवस्थान ही सार्वजनिक संस्था, तिच्याकडे येणारा पैसाही समाजाचा, म्हणून त्याचा वेच योग्य ठिकाणी आणि काटकसरीनं करायचा हे तुमचं सूत्र होतं. हे न कळणार्‍यांनी तुम्हाला कृपणही म्हटलं असेल. देवस्थानचं शिक्षणसंकुल तुमच्या दूरदृष्टीनं विस्तारलं आणि कॅन्सर हॉस्पिटलचा भक्कम पायाही तुम्हीच  द्रष्टेपणानं घातला. देवस्थानचा पैसा तुम्ही शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक कार्याकडे मोठ्या कौशल्यानं वळवला. अप्पासाहेब, तुमच्या ह्या द्रष्टेपणाला खरंच सर्वांनी सलाम करायला हवा. कार्याचा केवळ आरंभ करून भागत नाही, ते रुजवावं लागतं. जोपासावं लागतं आणि रक्षावंही लागतं, याचं नेमकं भान तुम्हाला होतं. त्यासाठी तुम्ही माणसं मिळवली, जोखली आणि सांभाळली. स्तुतिपाठक किंवा चमचेगिरी करणारे खरे हितचिंतक नसतात, याची जाणीव तुमच्यापेक्षा अधिक कुणाला होती? म्हणून माणसं तुम्ही ‘निवडून’ जवळ केली अन् त्यांच्या साहाय्यानं आपलं कार्य विस्तारत नेलं. सद्गुणाचा अतिरेक झाला की तो अवगुण ठरण्याची शक्यता असते, तसंच अवगुण काबूत ठेवला तर त्याचा सदुपयोगही करता येतो हे तुम्ही ओळखलं. विष मारक असलं तरी त्याची सौम्य मात्रा मात्र जीवनदायी ठरू शकते, याची जाण असल्यामुळेच तुम्ही विविध वृत्ती-प्रवृत्तींच्या माणसांचा योग्य उपयोग करून घेतला. फटकळपणा आणि परखडपणा यातील सीमारेषा धूसर असते. सामान्यांना हा फरक कळेलच असं नाही. ते फटकळ माणसाला परखड म्हणतील अन् परखड माणसाला फटकळ. परंतु अप्पासाहेब, तुम्ही यातला फरक ओळखून परखड माणसांना बरोबर जवळ केलं. तुम्ही माणसाची आणि गुणांचीही कदर केली. तुम्ही पाठीवर मारलेली शाबासकीची थाप कुठल्याही पुरस्कारापेक्षा अधिक मूल्यवान होती.

निराधार गाईंना आधार देणारं पांजरापोळ, कर्करुग्णांच्या दु:खावर मायेची फुंकर घालणारं कॅन्सर हॉस्पिटल, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देणारं संगमेश्‍वर आणि सिद्धेश्‍वर शिक्षणसंकुल, आसपासची लहानमोठी वृत्तं घराघरात पोचविणारा संचार, कृषीवलांच्या आशेचा किरण ठरलेला साखर कारखाना ही तुमची खरी स्मारकं आहेत. तुम्ही संस्थांना घराण्यातल्या पूर्वपुरुषांची नावं दिली नाहीत. संगमेश्‍वर-सिद्धेश्‍वर अशी दैवतांची दिली आणि त्या संस्थांना दैवतरूप मानलं. संगमेश्‍वर कॉलेजसमोरून कारमध्ये जाताना कुणाच्या लक्षात येणार नाही अशाप्रकारे तुम्ही मस्तक झुकवत होता. सिद्धेश्‍वर साखर कारखान्यात गेल्यावरही तुम्ही असेच नम्र होत होता. संस्था आपल्या दैवतांची आधुनिक स्मारकं आहेत, हीच भावना तुमच्या मनात नांदत असली पाहिजे. अप्पासाहेब, तुमची ही भावुकता आम्हाला अंतर्मुख करणारी आहे. फळांनी लहडलेल्या वृक्षासारखी तुमची नम्रताही आम्हाला विलोभनीय वाटते.

खिशात थोडा पैसा खुळखुळू लागला की माणसाची जीभ बेलगाम बनते असा अनुभव आहे. पैशानं जगातलं सारं काही खरेदी करता येतं अशा भ्रमानं माणसं वागू-बोलू लागतात. सत्ता आणि संपत्ती माणसाला मुजोर बनवते, हे खरं आहे. लायकी नसलेल्याला उच्चपद मिळालं की तो स्वत:ला ताडमाडच समजू लागतो. या पार्श्‍वभूमीवर तुमची पिढीजात श्रीमंती आणि तुम्ही भूषविलेली उच्च पदं किती वेगळेपणानं उठून दिसतात. श्रीमंतीचा अहंकार नाही, बडेजाव नाही, प्रदर्शन नाही. सारं कसं देवघरात शांत तेवणार्‍या नंदादीपासारखं अबोल, स्निग्ध अन् प्रकाशमय. हातात ‘दैनिक संचार’सारखं वृत्तपत्र असूनही त्यात आपला फोटो अन् नाव येऊ नये याची दक्षता तुम्ही हयातभर घेतली, हे ऐकलं की खरंच आश्‍चर्य वाटतं. ‘काम कणभर प्रसिद्धी मणभर’ अशा आजच्या काळात तर अप्पासाहेब, प्रसिद्धीनं कहर मांडलाय. युवकांचं आशास्थान असलेलं गल्लीबोळातलं नेतृत्व हातात मोबाईल घेऊन दरवर्षी जाहीर वाढदिवस साजरा करीत असतं. वाढदिवसांच्या पानंभरून जाहिराती अन् त्यातून घडणारं पैशाचं ओंगळवाणं प्रदर्शन पाहणं हे संवेदनशील मनाला किती क्लेशदायक आहे, हे सांगणंही कठीण आहे. अशा पार्श्‍वभूमीवर तुमचं प्रसिद्धीपराङ्मुखत्व शिवालयाच्या गाभार्‍यातल्या नि:शब्द शांततेसारखं सुखद वाटतं.

यश अन् अपयश पचवायला स्थिरबुद्धीच लागते. अपयशापेक्षाही यश पचवणं अधिक कठीण असतं. अपयश एकट्यालाच एकान्तात भोगावं लागतं, पण यश डोक्यात भिनलं की लोकान्तात कहर माजवतं. तुम्ही राजकीय जय-पराजय शांतपणे पचवले. अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले राजकीय समीक्षक मतांची बेरीज-वजाबाकी करीत असताना तुम्ही मात्र शांतपणे आपल्या घरात चेहर्‍यावर स्मित खेळवत बसलात. असं स्थितप्रज्ञत्व सहजपणे अंगी येत नाही. त्यासाठी तपस्याच लागते. जय-पराजयापेक्षाही दु:खाच्या वादळांनीच तुम्हाला गदगदा हलवलं. तीन कर्त्या मुलांचे मृत्यू तुम्हाला अगतिकपणे पाहावे लागले. थोराच्या आधी पोरं जातात हे पाहताना थोराच्या मनाला किती यातना होत असतील याची कल्पनाच करवत नाही. पण ते अटळ दु:खभोग तुम्ही निमूटपणे सोसले अन् हृदयातला अंधार सावरत चेहर्‍यावर स्मित पेरून तुम्ही नवनव्या योजनांना सामोरे गेलात. तुमचं शरीर थकलं, पण मन थकलं नाही, पावलं थबकली नाहीत. तुमच्या डोळ्यांनी आभाळस्वप्नं पाहण्याचं सामर्थ्य कधी हरवलं नाही.

राजकारण, समाज, शिक्षण, सहकार अशा सर्व क्षेत्रांत अप्पासाहेब, तुम्ही आपली नाममुद्रा उमटवली. स्वरातून पाझरणार्‍या निसर्गदत्त मार्दवानं आणि मुद्रेवरल्या स्नेहल स्मितानं तुम्ही माणसं जिंकली, आपलीशी केली. तुम्ही थोरामोठ्यांचा आदर्श घेतला आणि त्यात आपलं अंगभूत कार्यकर्तृत्व मिळवून स्वत:चा आदर्श पुढल्या पिढीसमोर ठेवला. तुमचं उदंड कर्तृत्व पाहिलं की तुमच्या व्यक्तित्वाची उंची नजरेत भरते आणि आमचं खुजेपणही जाणवतं. तुकारामांचा एक अभंग आहे:--

‘चंदनाचे हात पायही चंदन।
परिसा नाही हीन कोणी अंग॥’
चंदनवृक्ष हा अंतर्बाह्य सुगंधित असतो. त्याचं कुठलंही अंग हीन नसतं. त्याप्रमाणे अप्पासाहेब, आपल्या ८३ वर्षांच्या जीवनात तुम्ही चंदनासारखंच जगलात, दरवळलात आणि आपल्या अवतीभोवतीच्या परिसराला, माणसांना सुगंधित करून गेलात. आपल्या आसपास आकाशाशी स्पर्धा करणारे वृक्षच नाहीत असं म्हणणार्‍या आमच्या पिढीला तुमच्या रूपानं राजकीय, शैक्षणिक, सहकार, सामाजिक क्षेत्रांत वावरणारं एक समृद्ध व्यक्तिमत्त्व पाहायला मिळालं हे आमचं केवढं भाग्य!
***

Wednesday, August 30, 2017

‘समन्वयवादी'
(डॉ. बाबूराव गायकवाड,
 मराठी विभाग प्रमुख, कर्नाटक विद्यापीठ, धारवाड)
गौरवग्रंथातील लेख

Tuesday, August 29, 2017

नमस्कार.
मी चाळीस वर्षांपासून विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यांपैकी बरेचसे ग्रंथरूपात प्रकाशित झाले आहे. परंतु त्याशिवाय अजूनही बरेच स्फुट लेखन वृत्तपत्रांतून प्रकाशित झाले आहे. ते येथे एकत्रित करून प्रकाशित करण्याचा प्रयत्न करणार आहे.
जिज्ञासू वाचकांनी ते वाचून त्यावर आपापले अभिप्राय परखडपणे नोंदवावेत, ही विनंती.

डाॅ. शे. दे. पसारकर
संवाद : 9420 780 570